कोल्हापूर : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) मुंबईत झालेल्या ‘टेकनेक्स्ट २०१७’ परिषदेत प्रतिष्ठित महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी हे प्रतिष्ठित प्राचार्य आणि संगणक विभागप्रमुख डॉ. प्रीती पाटील या ‘कार्यशील विभागप्रमुख’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरतर्फे ‘टेकनेक्स्ट’ परिषद घेण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. पुरस्कारासाठी महाविद्यालयात संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत अभ्यासक्रम राबविणे, विद्यार्थी व प्राध्यापक यांना अभ्यासक्रम संपादन करण्यास प्रोत्साहन देणे, महाविद्यालय व उद्योगविश्व यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे; त्याअंतर्गत विविध स्पर्धा, उपक्रम, असे विविध निकष लावण्यात आले. ‘केआयटीने’ या सर्वच क्षेत्रांत कामगिरी सिद्ध करीत ठसा उमटविला आहे. गुणवत्ता अधोरेखितगेल्या ३४ वर्षांच्या प्रवासात केआयटीने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. त्यामध्ये ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन, शिवाजी विद्यापीठाची कायमस्वरूपी संलग्नता, गुणवत्ता पुरस्कार, सामंजस्य करार या प्रमुख गोष्टी आहेत, असे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या केआयटीची वाटचाल स्वायत्त शैक्षणिक संस्था होण्याच्या दृष्टीने सुरू आहे. ‘टेकनेक्स्ट’च्या या पुरस्काराने महाविद्यालयाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. या यशासाठी ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली व अन्य विश्वस्त, उपप्राचार्य, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे. मुंबईत झालेल्या ‘टेकनेक्स्ट २०१७’ परिषदेत प्रतिष्ठित महाविद्यालय पुरस्कार ‘केआयटी’चे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘केआयटी’ला प्रतिष्ठित महाविद्यालय पुरस्कार
By admin | Published: April 13, 2017 11:35 PM