कोल्हापूर : मी पोलीस आहे, पुढे दरोडा पडला आहे, साहेबांनी तपासणी करायचे आदेश दिले आहेत, तुमच्याजवळ काय आहे त्या दाखवा अशी बतावणी करुन वृध्दाच्या गळ्यातील ३० हजार किंमतीची सोन्याची चेन भामट्याने हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.अधिक माहिती अशी, प्रमोद पुरंदर दिगे (वय ६४, रा. राजारामपुरी सहावी गल्ली) हे खासगी कंपनीमधून निवृत्त आहेत. रविवारी शाहुपूरी येथील जैन मंदिरात जाण्यासाठी घरातून ते बाहेर पडले. शाहुमिल सहारा टॉवस समोर येताच पाठिमागून दूचाकीवरुन ३५ वर्षाचा अज्ञात तरुण आला. त्याने दिगे यांना अडवून मी पोलीस आहे, समोर दरोडा पडला आहे. तुमची तपासणी करायची आहे, तुमच्या जवळ काय आहे सांगा, असे सांगितले.
हे ऐकून दिगे बिथरले. त्यांनी आपलेवजळ काही नसल्याचे सांगितले. त्याने शर्टची कॉलर बाजूला करुन गळ्यातील चेन काढून रुमालात बांधून खिशात ठेवा असे सांगितले. त्यांनी लगबगीने चेन काढली. यावेळी भामट्याने हातचालाकी करुन त्यांच्या हातामध्ये रुमाल दिला. त्यानंतर तो दूचाकीवरुन निघून गेला.
काही अंतर पुढे जावून दिगे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये चेन नव्हती. आपली फसवणूक झालेची खात्री झालेनंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भामट्याने लाल शर्ट, त्यावर जॅकेट व जिन्सची पॅन्ट घातली होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.