कोल्हापूर : मेळावा घेण्यासाठी परवानगी मागूनही दिली गेली नाही. याउलट पोलिसांनी सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला. हा प्रकार संपर्क मंत्री, शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातला असून, ते आज, रविवारी पोलिसांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंगवले म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ट्रॅक्टर रॅली झाली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी आणि नंतर मेळावे झाले. महापालिका आरक्षण सोडत झाल्यानंतर आपल्याच प्रभागात एका इच्छुकाने ५० ते ६० लोक घेऊन फिरून आतषबाजी केली. हे सर्व पोलीस प्रशासनाला दिसले नाही. याउलट प्रभागातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेल्यामुळे राजवाडा पोलिसांनी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल केले. जनतेचे प्रेम असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने ते उपस्थित राहिले. यामध्ये परवानगी मागणारे की न देणारे दोषी आहेत. इतर पक्षांना शिवसेनेची भीती वाटत असल्यामुळेच असा त्रास दिला जात आहे. यावेळी अनिल इंगवले, बाबासो पाटील, बाळासाहेब शिंदे, किशोर पाटील, आदी उपस्थित होते.