पन्हाळा : मनुवादी आणि सनातनी विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाहीवर संकट आले आहे. लोकशाहीच्या बचावासाठी सनातनी प्रवृत्ती हाणून पाडण्याची गरज असून, त्यासाठी आजच्या युवापिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ भाषा संशोधक आणि विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी येथे केले.
येथे श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवन नॉलेज सिटीचे अध्यक्ष पी. आर. भोसले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्रा. एन. आर. भोसले, डॉ. सुरेखा देवी, आदी मान्यवर उपस्थित होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने हे शिबिर घेतले जाते. ‘मी आणि माझा भवताल’ हा बीजविषय होता.
डॉ. देवी म्हणाले, सध्या जगात भांडवलशाही एकवटत आहे. त्यामुळे एकूण राज्यव्यवस्थेचे नियंत्रण भांडवलशाहीकडे येत आहे. हे समाजासाठी घातक आहे. जेव्हा संपत्तीचे केंद्रीकरण होते, तेव्हा विविधतेवर हल्ला होतो. देशात वेगळा विचार मांडणाऱ्यांवर ट्रोलिंगच्या माध्यमातून हल्ले केले जात असून, ही अपराधी प्रवृत्ती दिवसें-दिवस वाढतच आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘मी व माझे भावविश्व’ या विषयावर; तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कृष्णात कोरे यांनी ‘विज्ञान, अंधश्रद्धा व विवेकी जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत अजित अभ्यंकर सरकारच्या विद्यार्थीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनियर यांनी सत्ताधाºयांकडून लोकांच्या मनात जाणीवपूर्वक अन्य जात व धर्मियांच्याबद्दल पूर्वग्रह रूजविले जात असल्याची टीका केली.
पर्यावरण तज्ज्ञ अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी वंचित समाजघटकांचे प्रश्न मांडून ते कसे सोडवता येतील याची माहिती दिली. नाट्यलेखक प्रा. डॉ. हिमांशू स्मार्त, पत्रकार संजय आवटे, प्राचार्य आनंद मेणसे, ज्येष्ठ अभ्यासक दत्ता देसाई यांनी विवेचन केले. शाहीर कॉम्रेड सदाशिव निकम यांनी शाहिरी जलशातून प्रबोधनाचा जागर केला.
शिबिरात लिंगभाव, मैत्री-प्रेम-विवाह, विवाह संस्था या विषयांवरील लघुपटांचे प्रदर्शन झाले. सुरेश शिपूरकर यांनी संकलित केलेल्या ‘सत्य काय आहे’ या पुस्तिकेचे प्रकाशन हस्ते झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मेघा पानसरे, प्रा. डॉ. मंजुश्री पवार, सुशील लाड, मल्हार पानसरे, प्रशांत मगदूम, अरविंद भोसले आदींनी परिश्रम घेतले.कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर प्रबोधन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी विवेचन केले. यावेळी प्रा. मेघा पानसरे, प्रा. पी. आर. भोसले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.