मलकापूर : पांढरेपाणी (ता. शाहूवाडी) येथील पावनखिंड येथे आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यास शाहूवाडी पोलिसांनी परवानगी नाकारावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे राज्य परिषद सदस्य राजू प्रभावळकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांना देण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, पावनखिंड हे ठिकाण ऐतिहासिक असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण आहे. येथे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळे धारातीर्थ पडले आहेत. कोल्हापुरातील हिल रायडर्सच्यावतीने गिर्यारोहक जयदीप जाधव व रेश्मा पाटील यांचा विवाह होणार आहे. अनेक शिवभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पावनखिंड येथे विवाह सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारावी. या पवित्र भूमीचे पावित्र्य राखावे. अन्यथा, आम्हाला विरोध करावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजू प्रभावळकर, राजू केसरे, चारुदत्त पोतदार, विजय भिंगार्डे, रंगराव जामदार, सरपंच मारुती चौगुले, सुहास पाटील, दिगंबर कुंभार, आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)शासकीय अधिकाऱ्यांची अनास्थानरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची तिथीप्रमाणे १३ जुलैला पुण्यतिथी होती. मात्र, शासकीय स्तरावर दरवर्षी पावनखिंडीत जाऊन नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानवंदना दिली जाते. मात्र, चालूवर्षी शासकीय स्तरावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीचा विसर शासकीय अधिकाऱ्यांना पडला. याची चर्चा शिवभक्तांमध्ये होती. शासकीय अधिकाऱ्यांनी तिथीप्रमाणे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी साजरी केलेली नाही. तालुक्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे.- राजू प्रभावळकर, माजी नगरसेवक, राज्य परिषद सदस्य.
पावनखिंडीतील विवाह रोखावा
By admin | Published: July 20, 2016 11:33 PM