लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कागल शहरातून दुधगंगा नदीला मिसळणाऱ्या ओढ्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याने नदीचेही पाणी प्रदूषित होत आहे. यावर नगरपालिकेने उपाययोजना करावी यासह विविध मागण्या व समस्यांचे निवेदन वनमित्र संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, शिवराज्य मंच यांच्यातर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी देण्यात आले.
नागोबा ओढ्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने त्यावर प्रक्रिया करावी, ऐतिहासिक जयसिंगराव तलावालगत गौण खनिजांची बेसुमार पद्धतीने लूट केली जात असल्याने तलावालाच धोका निर्माण झाला आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाकडे लक्ष द्यावे, शहरातील मोकाट श्वान व घोड्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी सागर कोंडेकर, इंद्रजित घाटगे, विक्रम चव्हाण, नितीन काळबर, नानासो बरकाळे, अशोक शिरोळे, अरुण जकाते, संदीप घाटगे, विजय बागल, अक्षय चौगुले, आदी उपस्थित होते.