कोल्हापूर : तूरडाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, आठ दिवसांत ते नक्कीच कमी होतील, असा विश्वास महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने ते कोल्हापुरात आले असता शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसे म्हणाले की, कोल्हापूर महापालिकेत काही वर्षांतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने केलेला कारभार हा निराशाजनक आहे. सुज्ञ मतदारांनी देशात आणि राज्यात ज्याप्रमाणे भाजपला सत्ता दिली, त्याप्रमाणे कोल्हापुरातील सुज्ञ जनता ही महायुतीला मतदान करील. या निवडणुकीत महापालिकेत महायुतीचीच एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वासही खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. तूरडाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, येत्या आठ दिवसांत ते नक्कीच कमी होतील.खडसे पुढे म्हणाले की, साहित्य आणि राजकारण या भिन्न बाबी आहेत. त्यामुळे देशात घडणाऱ्या काही दुर्दैवी घटनांबद्दल सरकारला जबाबदार धरून साहित्यिकांनी अचानक पुरस्कार परत करणे हे अयोग्य आहे. यापूर्र्वी देशात अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यावेळी या साहित्यिकांनी पुरस्कार का परत केले नाहीत? असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
तूरडाळीचे भाव आठ दिवसांत उतरतील
By admin | Published: October 24, 2015 1:03 AM