जोतिबा : ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात आज श्री जोतिबाचा पहिला रविवार खेटा संपन्न झाला. हजारो भविकांनी आज गजर करत, चालत पहिला खेटा पूर्ण केला. सेवाभावी संस्थांनी प्रसाद वाटप करून दर्शनरांगेचे व्यवस्थापन केले.श्री जोतिबाच्या खेटे यात्रेला भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होऊ लागली. कोल्हापूर ते जोतिबा या पारंपरिक पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. प्रसाद वाटपासाठी सेंट्रल प्लाझाची जागा निवडली होती. मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. दर्शनरांगेच्या व्यवस्थेसाठी अनिरुद्ध उपासना केंद्राचे ५० कार्यकर्ते, देवस्थान कर्मचारी, पुजारी समितीचे कर्मचारी दर्शनरांग नियंत्रणासाठी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता उंट, घोडा, वाजंत्रीसह श्री जोतिबाचा सुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल-खोबऱ्यांची उधळण करीत ‘चांगभलंऽऽ’चा गजर केला. रात्री आठ वाजता श्री जोतिबाचा पालखी सोहळा निघाला. रात्री १० पर्यंत भाविकांची गर्दी होती.दरम्यान, श्री जोतिबा मंदिरात रविवारी पाद्यपूजा, काकड आरती, अभिषेक, आरती, महापूजा, शेजारती, आदी धार्मिक विधी संपन्न झाले. सेवाभावी ट्रस्ट, मंडळ यांनी चालत येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपाहाराचे वाटप केले. (वार्ताहर)
जोतिबाच्या खेट्यासाठी भाविकांची गदी
By admin | Published: February 09, 2015 12:29 AM