कोल्हापूर : शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे; त्यामुळे प्राथमिक शिक्षक संघाच्या सभासद, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, तालुकास्तरीय संघटनांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी रविवारी येथे केले.
येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षकांचा मेळावा घेण्यात आला. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांची पहिली पुण्यतिथी उद्या, मंगळवारी आहे. या पुण्यतिथीनिमित्त राज्यात तालुका, नगरपालिका, महानगरपालिका पातळ्यांवर प्रतिमापूजन, त्यांच्या कार्याचा आढावा, रक्तदान शिबिर, आदर्श शिक्षकांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात याव्यात, असे आवाहन संघाचे राज्याध्यक्ष वरुटे यांनी केले. तालुकास्तरावरील शिक्षकांचे विषयशिक्षक समायोजन, एमएससीआयटीला स्थगिती, आदी सोडविलेल्या प्रश्नांची माहिती जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी दिली. शिक्षक बँकेच्या वाटचालीचा आढावा बँकेचे अध्यक्ष जी. एस. पाटील यांनी मांडला. सुकाणू समितीचे सदस्य दामोदर सुतार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवी नागटिळे, पी. के. पाटील, साहेब शेख, अरुण पाटील, नामदेव रेपे, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, अण्णासो शिरगावे, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग केणे, दत्तात्रय कडव, तानाजी पोवार, डी. पी. पाटील, आदी उपस्थित होते. वसंत जाधव यांनी स्वागत केले. उत्तम सुतार यांनी प्रास्ताविक केले. सदानंद पाटील यांनी आभार मानले.
चौकट
शिक्षकांचा सत्कार
या मेळाव्यात तालुकास्तरीय अध्यक्ष, पीएच.डी.प्राप्त आणि विविध पुरस्कारप्राप्त १८ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
फोटो (१३१२२०२०-कोल-शिक्षक संघ ०१ व ०२) : कोल्हापुरात रविवारी प्राथमिक शिक्षकांच्या मेळाव्यात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दामोदर सुतार, संभाजी बापट, जी. एस. पाटील, पी. के. पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)