कोल्हापूर : मार्च महिन्यापासून कोणताही लेखी आदेश न देता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन थांबविल्याच्या निषेधार्थ व पगार थांबविण्याचे तोंडी आदेश देणार्या शिक्षण सहसंचालक सुनील मगर यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने आज (सोमवार) ‘भीक मांगो’ आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन महासंघाच्यावतीने सहायक उपसंचालक संपतराव गायकवाड यांना दिले. गायकवाड यांनी तुमच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र कोरे म्हणाले, खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन त्यांचे समायोजन अन्य शाळांत होईपर्यंत त्याच शाळेतून देण्याचे शासनाचे आदेश असतानाही, शालार्थ वेतनप्रणालीमध्ये वेतन काढण्याची सोय नसल्याच्या कारणावरून शिक्षण विभागाने मार्च २०१४ मध्ये बेमुदत कालावधीकरिता या कर्मचार्यांचे वेतन रोखलेले आहे. याबाबत वेळोवेळी महासंघाचे वतीने अधिकारी पातळीवर निवेदन देऊन चर्चा केली, पण याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अतिरिक्त ठरलेला शिक्षक व कर्मचारी त्याचे समायोजन केलेल्या शाळांत हजर होण्यास गेल्यानंतर त्याला त्या शाळेत मुख्याध्यापक संस्थेच्या आदेशानुसार हजर करून घेण्यास नकार दिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक कर्मचार्यांचा कोणताही दोष नसताना त्यांचा पगार थांबविणे म्हणजे या कर्मचार्यांवर अन्याय आहे. सहायक उपसंचालक संपतराव गायकवाड यांनी तुमच्या भावना शासनदरबारी पोहोचवू, असे आश्वासन दिले. आंदोलनात बाळासाहेब चव्हाण, शीतल नलवडे, रंगराव कुसाळे, प्रकाश भोसले, अशोक कांबळे, राजेंद्र पांढरबळे, नंदाताई देशमुख, वैशाली सायखेडकर, विद्या बारामती, अर्जुन कांबळे, विजय केंद्रे, सर्जेराव भोसले, दत्तात्रय मगदूम, राजाराम संकपाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षकांचे ‘भीक मांगो’ अभिनव आंदोलन
By admin | Published: May 13, 2014 9:46 PM