शिरटे : येत्या २६ जानेवारीच्या झेंडावंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपापल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्चमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जावे लागेल, असा अंदाज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे श्री पशुपती विकास सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बी. डी. पवार होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सहकारी चळवळीचा वाटा मोठा आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे अनेक पर्याय निर्माण झाले तरी, सहकाराचा मूलमंत्र कधीही विसरता कामा नये. नोटाबंदी व जीएसटीने देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. आश्वासनांच्या स्वप्नात असणाऱ्या जनतेत निराशावादी विचार वाढू लागला आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार घालविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.
राजारामबापू शुगर टेकचे संस्थापक बी. डी. पवार म्हणाले, सोसायटीच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच प्रगतीचे टप्पे पार केले आहेत.उपसरपंच व संस्थेचे अध्यक्ष नीलेश पवार यांनी प्रास्ताविक केले. बी. के. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी भरत देशमुख, उमेश पवार, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, सुनील पोळ, ‘कृष्णा’चे संचालक सुजित मोरे, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, रमेश पाटील, भरत कदम, प्रशांत रणदिवे, विशाल पवार, कल्पना कोळेकर आदी उपस्थित होते.जिल्हा बँकेचे नफ्याचे शतक होणार : पाटीलजिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने बँकेला तालुकानिहाय वेगवेगळे धोरण आखावे लागते. यावर्षी बँकेला १०० कोटी रुपयांचा नफा होणार आहे.