चंदगड : निवडणुकीपूर्वी व सरकार स्थापनेपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ, असा विश्वास देणाऱ्या पंतप्रधानांना सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. मात्र, शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार आहे. सात-बारा कोरा करण्यासाठी कोल्हापूर येथे ४ मे रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या कर्जमुक्ती अभियान रॅलीमध्ये ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव न देणे, योग्य भाव न देणे हा सरकारचा गुन्हा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाला सरकारच जबाबदार आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देऊ.राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून सात ते आठ लाख शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, विदर्भ व कोकण येथेही सभा घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी चळवळ उभी केली आहे. देशात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी धडपडणारा राजू शेट्टी एकमेव खासदार आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे होणाऱ्या कर्जमुक्ती अभियान महामोर्चाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारवर दबाव आणावा.यावेळी चंदगड पंचायत समिती सभापती जगन्नाथ हुलजी यांचा खासदार शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. दीपक पाटील, राजू पाटील, नवनीत पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी अशोक नरसिंगराव पाटील, कृष्णराव रेगडे, मधुकर पाटील, राजू व्हटकर, प्रशांत अनगुडे, कृष्णा पाटील, के. जी. पाटील, अनंत कागतकर, शशिकांत रेडेकर, शिवाजी पाटील, शैलेश चौगुले, अजित पवार, सागर संभूशेट्टे, सचिन शिंदे, विशाल चौगुले, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बाळाराम फडके यांनी प्रास्ताविक केले. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नवनीत पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांना शेतकऱ्यांचा विसर
By admin | Published: May 01, 2017 1:03 AM