आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी शिवाजी पुलासंदर्भात कायदा व न्याय मंत्रालयाकडे कायद्यामध्ये दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावात कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे पूलप्रश्नी पेच निर्माण झाल्याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट संसदेतील कार्यालयात घेऊन पुलाची परिस्थिती समोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी, खासगी सचिव राजीव टोपनो यांना बोलावून याप्रश्नी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी शिवाजी पुलासंदर्भात कायदा व न्याय मंत्रालयाकडे कायद्यामध्ये दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला होता; पण कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नसल्याचे दोन्ही मंत्र्यांना कळविले. या कायद्यात दुरुस्ती करण्याचे सर्वस्वी अधिकार संसदेला असतात. हे गांभीर्य ओळखून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेमधील कार्यालयात भेट घेतली.सुमारे वीस मिनिटे या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाने घातलेल्या निर्बंधांमुळे रेंगाळल्याचे सांगितले. १८७७ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या व धोकादायक बनलेल्या पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना धक्काच बसला. शिवाजी पुलास १३५ वर्षे पूर्ण झाली असल्याने हा पूल मुदत कालबाह्य झाला आहे. कोल्हापूर शहराकडील बाजूस पुलापासून ४० मीटर अंतरावर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील ‘ब्रह्मपुरी टेकडी’ आहे. नियमानुसार पुरातन वास्तूपासून १०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही. यासाठी पुरातत्त्व खात्याची मंजुरी आवश्यक आहे. या तरतुदीकडे बोट दाखवून या पुलाच्या कामावर निर्बंध घातले. परिणामी, सत्तर टक्के काम पूर्ण झालेल्या नव्या पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे महाडसारखी दुर्घटना होऊ नये, यासाठी तत्काळ मार्ग काढावा, असे संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी खासगी सचिव राजीव टोपनो यांना बोलावून शिवाजी पूलप्रश्नी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. जनतेच्या सुरक्षेशी खेळता कामा नये, असेही ते म्हणाले. हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधानांनी स्वत:च या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप केल्याने पुरातत्त्व कायद्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती होऊन शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल आशा वाढली आहे. (प्रतिनिधी)पुलाची छायाचित्रे दाखविलीखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, या भेटीत पंतप्रधान मोदी यांना पुलाची व त्यावरून होणाऱ्या वाहतुकीची छायाचित्रे दाखविली आणि जनतेच्या सुरक्षेबद्दल हेळ्सांड होत असल्याचे निदर्शनास आणले. त्यावरून पंतप्रधानांनीही त्यांचे गांभीर्य ओळखले.शिवाजी पूल हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे, याप्रश्नी कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणतेही बदल होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन याप्रश्नाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे मोदी यांनी, विषय संवेदनशील असल्याने प्रसंगी कायद्यात बदल करा; पण शिवाजी पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. - संभाजीराजे छत्रपती, खासदार
कोल्हापुरच्या शिवाजी पूलाच्या प्रश्नाची पंतप्रधानांकडून दखल
By admin | Published: March 25, 2017 6:11 PM