कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी पंजाबच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्यात अडथळा येवू शकतो अशी पूर्वसुचना राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिली होती. तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे.त्यामुळे घडलेला प्रकार हा नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा नियोजित कट होता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंजाब सरकारवर केला आहे. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे. पाटील म्हणाले, पंतप्रधानांसारख्या महनीय व्यक्तिच्या दौऱ्यावेळी पर्यायी मार्ग तयार ठेवला जातो. ते तेथून जाणारच असे गृहित धरून बंदोबस्त ठेवण्यात येतो. हवामानातील बदलामुळे ते रस्ता मार्गाने जावू शकतात असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी २,३ आणि चार जानेवारीला स्पष्ट केले होते. परंतू त्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दखलच घेतली नाही. उलट असे झालेच तर कोणावरही कारवाई करू नका असेच स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस अधिकारी एकत्र चहा पित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे होते तसेच खलिस्तातनवादीही होते.या ठिकाणाहून पाकिस्तानची सीमा जमीनमार्गे केवळ दहा किलोमीटर तर हवाईमार्गे तीन किलोमीटर होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यावर ड्रोननेही हल्ला होवू शकला असता. तरीही कॉग्रेसचे नेते या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत हे चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.
पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 6:46 PM