कोल्हापूर : पालघर येथील वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या आदित्य राजेंद्र खैरमोडे या युवकाचे कौतुक केले. खैरमोडे याने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे कौतुक करीत पंतप्रधाननरेंद्र मोदींनी ‘तुम रोजगार लेनेवाले नही, देनेवाले बनो,’ अशा शब्दांत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर त्याच्यासोबत मराठी भाषेतून संवाद साधला.त्यानंतर मोदी यांनी खैरमोडेंसी तुम्ही कोल्हापुरातून आलात काय, अशी मराठी भाषेतून संभाषणाला सुरुवात केली. त्यांनी पाणी पुन: वापर मत्स्यपालन प्रणालीची माहिती त्यांच्याकडून घेतली. महाराष्ट्रातील मत्स्यविकास विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत निवडलेल्या कोल्हापूर, विरार, लातूर, नांदेड येथी लाभार्थ्यांची संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनीही आदित्य खैरमोडे यांचा भाषणात विशेष उल्लेख करीत त्याच्या व्यवसायाची माहिती सांगितली.आदित्य हा कोल्हापुरातील जवाहरनगरातील असून, त्याने बी.एस्सी नंतर मत्स्य व्यवसायात झोकून दिले. त्याने गारगोटी परिसरातील पाल येथे प्रकल्प उभारला. त्यासाठी त्याचे वडील राजेंद्र खैरमोडे यांचे प्रोत्साहन लाभल्याचे सांगितले.दरम्यान, आदित्य यांनी हा प्रकल्प दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळवून देणारा असल्याचे सांगून टँकमधील मत्स्य शेतीची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सरबंदा सोनेवाल, राजीव रंजन सिंग, मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे आदी उपस्थित होते. युवराज चौगुले, विजय शिखरे, शरद कुदळे, सतीश खाडे, सुदर्शन पावसे यांचे सहकार्य लाभले.
पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या युवकाचे कौतुक, मराठीतून साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:50 PM