पेठवडगाव : चीन (चेंगडू) येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल गटात अभिज्ञा पाटीलने, मनू भाकर, यशस्विनी सिंग देसवाल यांच्या मदतीने सांघिक सुवर्ण पटकाविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये याची दखल घेत खेळाडूंची प्रशंसा केली. यात कोल्हापुरातील वडगावमधील नेमबाजपटू अभिज्ञा पाटील हिला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी अभिज्ञाने तीन मिनिटात आपला नेमबाजीतील जीवन प्रवास मांडला.अभिज्ञाने कोल्हापूरला जाऊन 2015 पासून नेमबाजीला सुरुवात केली. 2018 ला अभिज्ञा पहिल्यांदा मलेशियामध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत सहभागी होऊन कांस्यपदक पटकावले होते. तर आता चीनमध्ये सांघिक सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती दिली. तसेच आतापर्यंतच्या कामगिरी, घडामोडींचा आढावा घेतला.
पंतप्रधान माझ्याशी बोलल्यामुळे नेमबाजी स्पर्धेसाठी आणखी प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप मिळाली आहे. त्यामुळे ऊर्जा प्राप्त झाली आहे. मन की बात आयुष्यभर स्मरणात राहील. यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेताना आपण देशासाठी खेळायचे आणि भारताचा तिरंगा नेहमीच उंच राहील याची जाणीव ठेवू - अभिज्ञा पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू