दीपक जाधवकोल्हापूर : भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीबद्दल तरुणांची ऊर्जा आणि उत्साह वाढावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला सेल्फी पाॅइंट देशभरातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उभारण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. या सेल्फी पाॅइंटमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची माहिती असली तरी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध योजनांची जाहिरात करून सरकारने सेल्फी पाॅइंटच्या आडून युवकांपर्यंत पोहोचण्याचा नवा प्रचार फंडा राबविल्याची कुजबुज शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने १ डिसेंबर रोजी देशातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना पत्र पाठवून पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेला सेल्फी पाॅइंट उभा करावा, अशा सूचना केल्या आहेत.
सेल्फी पाॅइंट कशासाठी?भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सेल्फी पाॅइंट उपयोगी ठरेल. तरुणांमधील ऊर्जा, उत्साह आणि मनाची जडणघडण यातून विविध क्षेत्रांत केलेली प्रगती यातून दिसेल. या सेल्फी पाॅइंटमधून नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत घेतलेल्या उपक्रमाची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या, यातून भारताने केलेल्या प्रगतीचा उत्साह साजरा करता येईल. हे सेल्फी पाॅइंट महाविद्यालयाच्या मोक्याच्या ठिकाणी उभा करा, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनोज जोशी यांनी या पत्राद्वारे दिल्या आहेत.
थ्रीडीत सेल्फी पाॅइंटसेल्फी पाॅइंटसाठी आयोगाने काही डिझाईन आणि थिम सुचविल्या आहेत. त्यात शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, विविधतेत एकता, हॅकाथाॅन, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान, स्मार्ट इंडिया यातून भारताची वाढणारी प्रतिष्ठा याचा समावेश आहे. हे सर्व सेल्फी पाॅइंट थ्रीडीत असावेत.
यूजीसीचा हा निर्णय म्हणजे शिक्षणाच्या स्वायत्तेवर सरकारचे आक्रमण आहे. यूजीसी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी सरकारच्या दावणीला बांधून घेऊ नये. सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ हे ठिकाण नव्हे. सरकारच्या या आक्रमणाला सर्व घटकांनी मिळून विरोध करायला हवा. -उदय नारकर, राज्य सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.