कोल्हापूर : कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या शुक्रवारी मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.यासाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासह एकूण १३ विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक होणार आहे. या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे गृहीत धरून सर्व पातळ्यांवर तयारी सुरू करण्यात आली आहे.याआधीही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नियोजनासाठी बैठका घेतल्या असून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते. या महोत्सवासाठी चाळीस लाख नागरिक आठ दिवसांत येणार असल्याचे गृहीत धरून नियोजन सुरू आहे. इतक्या नागरिकांसाठी आरोग्यापासून स्वच्छतागृहांपर्यंत, पाणीपुरवठ्यापासून ते पार्किंगपर्यंतचे नवीन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या प्रस्तावांच्या कार्यवाहीसाठीच ही बैठक घेण्यात आली आहे.
कणेरी हे करवीर तालुक्यात येत असल्याने यातील बहुतांशी यंत्रणा जिल्हा परिषदेची राबवण्यात येत असून, उर्वरित सर्व विभागांच्या समन्वयातून नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत.