कोल्हापूर - केंद्रीयमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पवारांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असा मजेशीर टोमणाही रामदास आठवेलंनी पवारांना लगावला.
लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, आता रामदास आठवलेंनीही कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना, अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी नुकतेच निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यावरही रामदास आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत पवारांची मजेशीर खिल्ली उडवली. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असे आठवलेंनी म्हटले. तसेच भाजपा-शिवसेनेनं एकतरी जागा आमच्या पक्षाला सोडावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेनेनं मुंबईची एक जागा मला सोडायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी मोठं मन दाखवावं आणि मला जागा सोडावी, अशी मागणी आठवेंनी केली आहे. दोन जागा देणं शक्य नसेल तर एक तरी जागा आमच्या पक्षाला द्या. दोघा नेत्यांनी ते ठरवावं आणि एक जागा रिपाइंला द्यावी. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायचं, हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांच आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जागा देण्याचा विचार करावा, असे आठवलेंनी म्हटले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप नाही. मोदी हा फकीर माणूस असून तरुणाईचा मोदींना पाठिंबा आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असे सांगत आम्ही मोदींसोबत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही 2 जागा द्या, अशी मागणी आम्ही योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. तर, आसाममध्येही 1 जागा मिळाविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी, मी अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे.