कोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांचा ‘ड’ वर्गात समावेश करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मागणीला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्त्वत: मान्यता दिली, अशी माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. राज्यातील निवडणुकीस पात्र संस्थांच्या उलाढालीनुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी वर्गवारी केली आहे. प्राथमिक दूध संस्थांचा ‘क’ वर्गात समावेश केल्याने या संस्थांच्या निवडणुका सहकार विभागातील अधिकारी घेणार आहेत. पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे अधिकार त्या संस्थांना होते. आता बदललेल्या नियमामुळे दूध संस्थांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. तसेच प्रत्येक सभासदापोटी शंभर रुपये निवडणूक खर्च भरावा लागेल. निवडणूक सहा महिने पुढे असताना सहायक निबंधक (दुग्ध) यांना निवडणुकीची कल्पना देणे बंधनकारक आहे. तसे केले नाही तर संस्थेवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते. अशा अटी संस्थांना त्रासदायक असल्याचे ‘गोकुळ’च्या शिष्टमंडळाने सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. दूध संस्थांचा ‘ड’ वर्गात समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावर मंत्री पाटील यांनी सहकार प्राधिकरणाचे सचिव प्रा. अनंत जोगदंड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर दूध संस्थांची वर्गवारी बदलण्यासाठी प्रयत्न करू. जरूर पडल्यास अध्यादेश काढू, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. याच मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्यावतीनेही मंत्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, उपव्यवस्थापक आर. जी. पाटील, ‘भाजप’चे संघटनमंत्री बाबा देसाई, महेश जाधव, आदी उपस्थित होते.
दूध संस्थांचा ‘ड’ वर्गात समावेश चंद्रकांत पाटील यांची तत्त्वत: मान्यता :
By admin | Published: November 21, 2014 11:39 PM