सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वानऊ कोटींची रक्कम चोरीप्रकरणी पुन्हा चर्चेत आलेला संशयित मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन मुल्ला याच्या, तो पूर्वी राहात असलेल्या मिरजेतील बेथेलहेमनगर येथील झोपडीवजा घरावर कोल्हापुरातील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात घराची झडती घेण्यात आली. मात्र, हाती काहीच लागले नाही.सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) गतवर्षी मैनुद्दीनच्या बेथेलहेमनगर येथील घरावर छापा टाकून सुमारे तीन कोटी दहा लाखांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम त्याने वारणानगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले होते. एलसीबीने वारणानगर येथे जाऊनही याचा तपास केला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते; पण एलसीबीने तपासाच्या नावाखाली वारणानगर येथून सव्वानऊ कोटीची रक्कम चोरल्याचे गेल्या आठवड्यात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, साहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, साहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनीच यातील सुमारे सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्याने या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला पुन्हा चर्चेत आला. गेल्या वर्षभरापासून तो गायब आहे. त्याला पकडण्यासाठी सीआयडीचे प्रयत्न सुरू आहेत. मैनुद्दीन हा बेथेलहेमनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होता. या गुन्ह्याची सुरुवात त्याच्या घरातूनच झाली होती. त्यामुळे सीआयडीचे पथक सोमवारी रात्री सांगलीत आले होते. पथकाने तो राहात असलेल्या खोलीवर रात्री उशिरा छापा टाकला. अर्धा तास तेथे झडती घेतली. पण हाती काहीच लागले नाही. तेथील लोकांकडे त्यांनी चौकशी केली. गेल्या एक वर्षापासून मैनुद्दीनला पाहिले नसल्याचे या चौकशीत लोकांनी सांगितले. (प्रतिनिधी)संशयितांना फरार घोषित करणार?कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणातील संशयित कुटुंबासह बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्याने ‘सीआयडी’ने या सर्वांना फरार घोषित करण्यासाठी मंगळवारी लेखी पत्र पन्हाळा न्यायालयास दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी तपास पथकातील काही अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक घेतली. संशयितांच्या अटकेसाठी त्यांच्या नातेवाईकांच्यावर पोलिसांनी दबाव आणला आहे. तत्काळ त्यांना हजर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘सीआयडी’चा मिरजेत छापा
By admin | Published: April 26, 2017 12:12 AM