कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथील खत कारखान्याच्या पिछाडीस सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापा टाकून सातजणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ६५ हजार रुपयांची रोखड, जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.संशयित गजानन चंद्रकांत भोपळे (वय ३८, रा. जिवबा नाना पार्क) संदीप रावसाहेब भंडारी (४१, हनुमाननगर आय. टी. आय.जवळ), कृष्णात मारुती पाटील (५८, सानेगुरुजी वसाहत), संदीप रामचंद्र कांबळे (३२, रा. कुरुकली, ता. करवीर), संजय दशरथ कांबळे (३६, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा), रमेश लक्ष्मण परीट (४०, रा. मिणचे खुर्द, भुदरगड), वसंत दामू राठोड (३२, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशी गावाजवळ असणाऱ्या खत कारखान्यामागील बाजूस जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डॉ. अमृतकर यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून संशयितांना अटक केली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.