लोकमत न्यूज नेटवर्क कसबा सांगाव : कागल येथील श्रमिक वसाहती शेजारी असणाऱ्या पठाण यांच्या घरावर कागल पोलिसांनी अवैधपणे चालणाऱ्या मटका बुकींवर टाकलेल्या छाप्यात रोख ८८ हजार ३२० रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत कागल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुनील आण्णासो चंदे (बच्चन-म्होरक्या), प्रभाकर नागनाथ कुलमणी, कुमार विजय सदलगे, आकाश अजित खोपडे, चंद्रकांत बापू परीट (मडिवाळ), गोपाळ बाबूराव खोत (सर्व रा. कागल), सुनील मल्लाप्पा मगदूम (पिंपळगाव खुर्द), सागर धोंडिराम पाटील (बाचणी) या आरोपींना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात रोख ८८ हजार ३२० रुपये, पाच मोबाईल हँडसेट, सात कॅलक्युलेटर, मोबाईल चार्जर, मटका जुगाराचे साहित्य, मुंबई-कल्याणची छापील पावती पुस्तके जप्त केली. कागल पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी ही कारवाई केली. श्रमिक वसाहत व नगरपालिकेचे जलशुद्धिकरण केंद्र यांच्या दरम्यान बाबासो पठाण यांच्या मालकीचे घर आहे. हे घर मटकाबुकीसाठी भाड्याने घेतले होते. कागल व परिसरातील एजंटाकरवी केलेल्या जुगारावरील पैशांचा हिशेब याच ठिकाणी चालत असे. सहायक पोलीस अधीक्षक नवटक्के या रविवारी सुटीवर असतात. याचा अंदाज घेऊन यापूर्वी असलेला हिशेबाचा दिवस बदलून रविवार घेतला होता. या ठिकाणी एजंट व मालकांचा हिशेब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवतिके, मनीषा नारायणकर, कॉन्टेबल बाबासो मुल्ला, प्रियांका साबळे, विष्णू जाधव यांनी धडक कारवाई केली. अवैधपणे सुरू असलेल्या धंद्यांना पायबंद घालण्याचे काम नवटक्के यांनी केले आहे. त्यांच्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे.
कागलमध्ये मटका अड्ड्यावर छापा
By admin | Published: June 19, 2017 12:55 AM