कोल्हापूर : येथील कदमवाडीत ओंकार अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत रोकड, मोबाईल संच, तीन दुचाकीसह एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयित आरोपींची नावे : रामचंद्र साऊधाऊ लांबोरे (६०), लक्ष्मण गणपती सूर्यवंशी (४४), शिवाजी विठ्ठल शिंदे (५२), सिद्धू भागोजी कोळेकर (५३), विशाल विनोद माने (३७ सर्व रा. कदमवाडी), मनोज हिंदूराव पाटोळे (३९ रा. भोसलेवाडी).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कदमवाडी येथील हायस्कूलशेजारील ओंकार अपार्टमेंटनजीक तीन पानी पत्त्याच्या पानाचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या पथकास मिळाली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता तेथे छापा टाकला. यावेळी खापरीच्या उघड्या शेडमध्ये सहा जण तीन पानी जुगार खेळताना आढळले. या छाप्यात सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून ५ हजारांची रोकड, चार मोबाईल संच, तीन दुचाकी वाहने असा सुमारे १ लाख २४ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.