कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड हा राहात असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती सनातन संस्थेची कागदपत्रे तसेच पुस्तके आदी दोन बॅगा भरून साहित्य मिळाले. पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी गेल्या मंगळवारी (दि. १६) संशयित म्हणून समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाला (पान ८ वर) सांगलीत अटक केली. गेली सात दिवस कोल्हापूर पोलिसांसह, एसआयटी, एनआयए, कर्नाटक सीआयडीचे पोलीस हे समीर गायकवाडकडे चौकशी करून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याने तपासकामात पोलिसांना कोणतेही सहकार्य केलेले नाही. त्याच्या प्रेयसीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी तपासात उघड झाल्या. तिने तपासात पोलिसांना पूर्णत: सहकार्य केले आहे. त्यामुळे तिला दररोज तपासासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले जाते, सायंकाळी तिच्या इचलकरंजीतील नातेवाईकांच्या घरी सोडले जाते. समीरची ठाण्यात खोली होती. त्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक सोमवारी मध्यरात्रीच ठाण्याकडे रवाना झाले. या पथकाने मंगळवारी सकाळी ठाण्यातील समीर राहत असलेली खोली शोधून काढली, त्या खोलीत तो एकटाच राहत असल्याचे निदर्शनास आले. त्या खोलीला असलेले कुलूप तोडून पोलिसांनी खोलीची झडती घेतली. त्या खोलीत पोलिसांना सनातन संस्थेची काही कागदपत्रे, संस्थेचा प्रसार करणारी पुस्तके तसेच अनेक संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याचे समजते. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे, काही साहित्य जप्त करून ते दोन बॅगामध्ये भरून हे पथक कोल्हापूरला मंगळवारी मध्यरात्री परतले. जप्त केलेल्या कागदपत्रांवरून अनेक गोष्टींचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.पोलिसी खाक्या दाखविताच ठाण्यातील वास्तव्य उघडतपासकामात पोलिसांना समीर गायकवाडने म्हणावे तितके सहकार्य केलेले नाही त्यामुळे पोलिसांना गेल्या सात दिवसांत त्याच्याकडून अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचे समजते.त्याने ठाण्यात एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांपासून लपवली होती पण त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून त्याचे ठाण्यात वास्तव्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.ठाण्यातील त्याच्या ठावठिकाणाबद्दल त्याला विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. सोमवारी मध्यरात्री त्याला पोलिसी ‘खाक्या’ दाखविताच त्याने ठाण्यातील वास्तव्याबद्दल माहिती दिल्याचे समजते.
समीरच्या ठाण्यातील खोलीवर छापा
By admin | Published: September 23, 2015 12:43 AM