लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: नावीन्य पूर्ण उपक्रम राबवण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यापेक्षा कायमच एक पाऊल पुढे असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. राज्य तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्याची योजना राबवत असताना कोल्हापुरात मात्र दोन वर्षांपूर्वीच ते दिले असून आता प्रिंटर दिले जात आहेत.
ग्रामपंचायत आणि महसूलचे काम ऑनलाइन करण्यासाठी म्हणून राज्य सरकार डिजिटल अभियान राबवत आहे. या अंतर्गत गावपातळीवरील महसूलच्या कामात वेग आणि पारदर्शकता यावी म्हणून तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यासाठी निधींचीही तरतूद केली आहे.
कोल्हापुरात तर २०१८ मध्येच तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले आहेत, आता त्यांना प्रिंटर देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी ७४ लाखाचा निधी ही सरकारकडून उपलब्ध झाला आहे. रिक्त जागा भरल्या जातील, तसे लॅपटॉप उपलब्ध करून दिले जात आहेत.
जिल्ह्यातील एकूण ४५२ तलाठ्यांना तर ७६ मंडल अधिकाऱ्यांना यापूर्वीच लॅपटॉप दिले आहेत, आता त्याना प्रिंटर दिले जात आहेत. आणखी ३८ जणांना लॅपटॉप दिले आहेत.
प्रिंटरच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांची असणार आहे. प्रिंटरवरून एक उतारा देण्यासाठी १५ रुपये फी आकारण्याची मुभा आहे, त्यातील ५ रुपये शासनाकडे जमा करायचे, शिल्लक 10 रुपयाने देखभालीसाठी खर्च करावयाचे आहेत.
प्रिंटरचा फायदा नागरिकांनाच जास्त होणार आहे. इतर ठिकाणी उतारा काढून घेतला तर किमान २५ ते ५० रुपये द्यावे लागतात. तलाठी मंडल अधिकारी कार्यालयातच दाखले काढले तर नागरिकांना जागेवरच कॉपी मिळणार आहे आणि तीही अवघ्या १५ रुपयात.