पन्हाळा : आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
पाटील म्हणाले की, साखर कारखान्यात कामगारांची संख्या वाढविण्यापेक्षा कार्यरत असलेल्या कामगारांनाच जास्त पगार व सुखसोयी देण्यासाठी प्रत्येक सहकारी साखर कारखान्याने प्राधान्य दिले पाहिजे. प्रारंभी जयंत पाटील व कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राज्य सहकारी साखर कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राऊसो पाटील यांनी स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), संघटनेचे उपाध्यक्ष युवराज रणवरे, कोषाध्यक्ष रावसाहेब भोसले, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, संजय मोरबाळे, कैलास आवळे, संतोष धुमाळ, आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.साखर क्षेत्रात नवतंत्रज्ञान हवेयावेळी अध्यक्षस्थानावरून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण जनता ही शेती व्यवसायावरच टिकून आहे. या गोरगरीब जनतेला रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी म्हणूनच सहकारी साखर कारखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. साखर क्षेत्रात आपणास टिकायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जुन्या तंत्रज्ञानामुळे आपण स्पर्धेत टिकणार नाही. तसेच स्थानिक परिस्थिती समजावून कामगारांनी व व्यस्थापन समितीने समन्वय साधून सहकारी साखर कारखाने चालविले पाहिजेत, असे सांगितले.पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जयंत पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, रावसाहेब काळे, आदी उपस्थित होते.