कोल्हापूर : शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला प्राधान्य द्या, व्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे १५ दिवसांच्या आत काढून तेथे पार्किंगची सुविधा करून द्या, अशा सूचना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाºयांना दिल्या. सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सायंकाळी ढवळे यांनी महापालिकेच्या प्रकल्प विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या.
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना ढवळे यांनी सांगितले की, एक वर्षाचा काळ काम करण्यास मिळणार असल्याने प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि नवीन प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त निधी सरकारच्या पातळीवर मिळविणे या कामांना प्राधान्य देत आहोत. शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृह सुधारणेचा दुसरा टप्पा, सेफ सिटी दुसरा टप्पा, कोंबडी बाजार व्यापारी संकुल, आदी प्रकल्पांवर चर्चा केली. या सर्व कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेथे राजकीय ताकद वापरून काही कामे करायची आहेत तेही सांगा. आमदार अमल महाडिक व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून ती पूर्ण केली जातील, असे अधिकाºयांना सांगितले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वैयक्तिक मालकीच्या प्लॉटवर बांधायच्या घरांसाठी १५० प्रस्ताव आले आहेत. त्यांपैकी १०० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पुढील चार महिन्यांत सहा लाख रुपयांचे कर्जसंलग्न अनुदान वाटप करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. खासगी विकसकामार्फत विकसित करायच्या २५० घरांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याच्या कामाचीही सुरुवात लवकरात लवकर करा. तसेच कदमवाडी, बोंद्रेनगर येथील झोपडपट्टीतील १४२ घरे विकसित करण्याचे काम हाती घ्या, अशा सूचना दिल्याचे ढवळे यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक शेखर कुसाळे, विजय खाडे उपस्थित होते.गाडीअड्डा अतिक्रमण १५ दिवसांत हटविणारव्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाकरिता आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण १५ दिवसांत हटविण्यात येईल. त्या ठिकाणी गेट बसवून वॉचमन नेमावा; तसेच पे अॅँड पार्क तत्त्वावर तात्पुरता वाहनतळ सुरू केला जाईल. अधिकृत गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाईल. मात्र अतिक्रमण हटविले जाईल, असे ढवळे यांनी सांगितले.सरस्वती चित्रमंदिरसमोर पार्किंग सोयअंबाबाई आराखड्यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. दर्शन मंडपावर नंतर निर्णय घेतला जाईल. सरस्वती चित्रमंदिरासमोरील वाहनतळ सुविधा विकसित केली जाणार आहे. तेथील ४५ गाळेधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.