कोल्हापूर : कोल्हापुरातील मृत्युदर देशात सर्वाधिक आहे या मरणाऱ्या माणसांना वाचवण्याची हाक बुधवारी समाजातून उमटली. लोकमतने मतदारांसाठी जोडण्या..रुग्ण मात्र वाऱ्यावर असे अत्यंत सडेतोड वृत्त प्रसिध्द करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जात नसल्याचे आसूड ओढले. सर्वसामान्य जनतेचीच भावना लोकमतने मांडल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.
कोल्हापूरात बारापैकी दहा आमदार व दोन्ही लोक नियुक्त खासदार हे सत्ताधारी महाविकास आघाडीचेच आहेत. त्यामुळे हातातील सत्तेचा वापर आणि मतदार संघातील जनतेसाठी स्वत:च्या हिंमतीवर कोविड सेंटर अथवा तत्सम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या रोज हजाराने वाढत आहे. मृत्यूही होत आहेत. परंतु लोकप्रतिनिधींना त्याचे काहीच सोयरसूतक नाही त्यावर या वृत्तात बोट ठेवण्यात आले.
गेल्यावर्षी कोरोना लाटेत महापालिकेची यंत्रणा अधिक जागरुक होती. एखादा संशयित रुग्ण सापडला की तो भाग तातडीने सील केला जाई. तिथे औषध फवारणीपासून अनेक उपाययोजना केल्या जात होत्या. परंतु यावर्षी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. नगरसेवक सध्या सत्तेत नसले तरी स्थानिक नागरिकांना मदत करू शकतात परंतु ते देखील यावेळी फारसे लोकांसाठी काम करताना दिसत नसल्याचे अनुभव काहीनी शेअर केले.
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ४५ दिवस सगळे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात एकवटलेले असतात. तसा निवडणूक प्रोटोकॉल लागू करून उपाययोजना केल्या जाव्यात. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत, त्यांना राजकीय नेत्यांनी मोकळीक देण्याची गरज असल्याचीही प्रतिक्रिया वाचकाने व्यक्त केली.
महिनाभर एकच टार्गेट
जिल्हा प्रशासन असो की लोकप्रतिनिधी या सर्वांचे सध्या फक्त आणि फक्त कोरोना रोखणे हेच टार्गेट हवे. एकमेकांवर राजकीय आरोपप्रत्योराप, उणीदुणी काढण्यापेक्षा सगळी ताकद लोकांना चांगले उपचार कसे मिळतील व त्यांचा जीव कसा वाचेल यावर केंद्रित करायला हवी अशाही भावना काहीनी व्यक्त केल्या.
सोशल मीडियावर धूम..
लोकमतच्या या वृत्ताची बुधवारी दिवसभर प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर ती सर्वाधिक शेअर झाली. कित्येकांनी ती स्टेटस म्हणूनही लावली. लोकमतकडे दिवसभरातही ५० हून अधिक लोकांनी फोन करून अशाच रोखठोक पत्रकारितेची अपेक्षा व्यक्त केली.