कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पूर्नवसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तीक, कौटूंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पूर्नवसन करण्यास प्राधान्य देवू असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम सुरु असून पूर्नवसन झाल्याशिवाय घळभरणी करु देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती, या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पूर्नवसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, भुसंपादन अधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. यावेळी ४४ अर्जांवर चर्चा होवून काही अर्ज निकाली काढण्यात आले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा धरणग्रस्तांचे पूर्नवसन झाले. आता आंबेओहोळच्या नागरिकांचे वैयक्तिक, कौटूंबिक अडचणी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, शासकीय नियमावली आहे, काही न्यायालयीन प्रकरणे आहेत त्या सगळ्यांवर पर्याय काढून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पूर्नवसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे. यादिवशी नागरिकांनी आपले अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे घेवून यावे, त्या प्रश्नावर समक्ष चर्चा करुन त्यावर निर्णय घेतले जातील असे सांगितले.श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, पूर्नवसन-संपादनाच्या संकलन यादीत प्रकल्पग्रस्ताच्या कुटूंबातील सूना, नातवंडे यांना ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांचाही समावेश करण्यात यावा, ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी, संकलन दुरुस्ती हे विषय मार्गी लागावेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, संजय तरडेकर, शंकर पावले, बजरंग पुंडपळ, सचिन पावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.