कोल्हापूर : माध्यमिक शिक्षक आणि संघटनांनी भूतकाळावर विश्वास ठेवण्यापेक्षा वर्तमानावर अधिक विश्वास ठेवून कार्यरत राहिल्यास कामाचा निपटारा करणे सहज साध्य होते. प्रलंबित काम पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील. एकही शाळा अथवा शिक्षक त्यांच्या हक्काच्या पगारापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले.
येथील कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफ कोल्हापूरतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा. त्यांनी क्षमता सिद्ध कराव्यात.
या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष राजेश वरक, कार्यवाह ईश्वरा गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख संजय सौंदलगे, हेमलता पाटील यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी लोहार यांची कार्यपद्धती जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघाच्या पदाधिकाºयांनी शिक्षणाधिकारी लोहार यांचा सत्कार केला. यावेळी जी. डी. रेळेकर, रघुनाथ मांडरे, दत्तात्रय चौगुले, प्रशांत जाधव, महेश सूर्यवंशी, प्रशांत चोपडे, महादेव चौगले, बाजीराव माणगांवे, संध्या वाणी, हेमलता पाटील, आदी उपस्थित होते.
कामाचा निपटारा होईल
संघाचे अध्यक्ष वरक यांनी शिक्षण खात्यातील उपशिक्षणाधिकारी यांच्या जागा रिक्त असल्याने एकाच व्यक्तीवर कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे कामात गती येत नसल्याचे दाखले दिले. यावर शिक्षणाधिकारी लोहार यांनी या परिस्थितीमध्ये देखील कामाचा निपटारा होईल, प्रलंबित कामांना प्राधान्याने अधिक वेळ दिला जाईल, असे सांगितले. माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफ यांच्यासमवेत लवकरच बैठक घेतली जाईल, असे सांगितले.