कोल्हापूर : क्रिकेटच्या टेनिस बॉलमधून कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला गांजा हा अमली पदार्थ पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. संरक्षण भिंतीवरून कारागृहाच्या खुल्या आवारात टेनिस बॉल फेकल्यानंतर तेथे त्यावेळी कोण-कोण असण्याची शक्यता होती, यासह पुण्याच्या कारागृहात असणाऱ्या शेख नामक कैद्याचीही चौकशी सुरू केली आहे.कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेकडील बाजूने उंच संरक्षण भिंतीवरून कारागृहाच्या आवारात गांजा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अमित पायगुडे, वैभव कोठारी, संदेश देशमुख (सर्व रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कारागृहात पुण्यातील मित्राच्या भावासाठी गांजा पोहोचविण्यासाठी मंगळवारी (दि. १०) पहाटे ते पुण्याहून कोल्हापूरला आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ते तिघे संशयित गांजा कारागृहाच्या आवारात फेकण्याच्या तयारीत होते. त्यांनी टेनिस बॉलचा चेंडू मधोमध कापून त्यात गांजा ठासून भरून तो पुन्हा चिकटपट्टीच्या साहायाने चिकटविला होता. क्रिकेट खेळण्याचे निमित्त करून बॉलिंगच्या बहाण्याने ते हे चेंडू कारागृहात फेकणार होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली. त्यानुसार कारागृह प्रशासनाने काही चेंडू कारवाईपूर्वी आवारात आलेत का यासाठी तातडीने कारागृहातील सर्व सीसी टीव्ही तपासले.
संबंधित कैदी हा न्यायलयीन कोठडीतील असून त्याच्याकडेही चौकशी सुरू आहे, तसेच कारागृहातील संपूर्ण परिसराची पाहणी प्रशासनाने केली. त्यात अशा पद्धतीचा चेंडू कोठे पडला आहे का? हे पाहण्यात आले. पण तशी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. तरीही संपूर्ण यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचे कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले.