कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला शिपाई सतीश दगडू गुंजाळ (सर्व रा. कळंबा कारागृह) याच्या अटकेबाबत गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे आज, शुक्रवारी गुंजाळ याच्या अटकेची शक्यता आहे. तसेच तीन कैद्यांचाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस न्यायालयाशी पत्रव्यवहार करत आहेत.
कारागृहात कैद्यांना गांजा पुरवीत असल्याच्या संशयावरून कारागृहातील विशेष तपासणी पथकाने बुधवारी कारागृहातील शिपाई सतीश गुंजाळ याच्यासह इंद्रजित पाचुराम बलोटिया, छेदीलाल ऊर्फ शिवा रामलाल निर्मळ, सुबोध प्रसाद ऊर्फ अनिल ऊर्फ छोटू जगदीश मेहता (सर्व रा. कळंबा कारागृह) या तीन कैद्यांची अंगझडती घेतली. यांच्याकडे एका आगपेटीत लपविलेल्या गांजासदृश अमली पदार्थाच्या आठ पुड्या व १५०० रुपये सापडले. पथकाने ते जप्त केले. याप्रकरणी शिपाई व तीन कैद्यांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला.
संशयित शिपाई गुंजाळ याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कारागृह अधीक्षकांशी गुरुवारी पत्रव्यवहार केला. त्यानुसार त्याला आज, शुक्रवारी अटकेची शक्यता आहे. कारागृहातील गुन्हा दाखल झालेल्या तिघा कैद्यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.