कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात अतिसुरक्षा विभागातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याने महिला तुरुंगाधिकारी व शिपाई यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी (दि. २३) घडली. शाकीर नसीर पठाण ऊर्फ मोठा पठाण असे त्या कैद्याने नाव असून, त्याच्याविरोधात रविवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तुरुंगाधिकारी सारिका मस्कर यांनी पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सारिका मस्कर या कळंबा कारागृहात तुरुंग अधिकारी (वर्ग २) म्हणून कार्यरत आहेत. त्या व शिपाई अशोक घारगे शनिवारी अतिसुरक्षा विभागात कर्तव्यावर होते. त्यावेळी शिक्षा भोगणारा कैदी शाकीर पठाण याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायचे आहे, असे सांगत गोंधळ माजवला. तुरुंगाधिकारी मस्कर व शिपाई घारगे यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांनाच धक्काबुक्की करत अतिसुरक्षा विभागातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्याला अडवताना कैदी नसीर पठाण याने शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी महिला तुरुंगाधिकारी सारिका मस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर: कळंबा कारागृहात कैद्याची महिला तुरुंग अधिकाऱ्यास धक्काबुक्की, पळून जाण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 1:37 PM