कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाचा परिसर नेहमीप्रमाणे आज, सोमवारी सकाळी रुग्ण, नातेवाइकांनी भरला होता. त्यातच कैद्यांना तपासणीसाठी ने-आण करणारी पोलीस व्हॅन आली. तपासणीसाठी कैदी उतरले. व्हॅन मागे घेताना अचानक गाडीचा ब्रेक निकामा झाला अन् गाडी वेगाने मागे येऊन प्रवेशद्वारानजीकच्या वॉचमन केबीनला धडकली. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. आवारात गर्दी, वाहनांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील कैदी दर तीन महिन्यांची वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस व्हॅनमधून सीपीआरमध्ये आणले जातात. सोमवारी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे कैद्यांना घेऊन व्हॅन आली. सीपीआरच्या जुन्या इमारतीसमोर सर्व कैदी व्हॅनमधून उतरले. त्यानंतर ही व्हॅन एका बाजूला पार्क करण्याच्या प्रयत्नात तिचा ब्रेक निकामा झाल्याने ती भरधाव वेगाने पाठीमागे आली. परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरडा केल्याने पळापळ झाली.अखेर ही व्हॅन एका पार्क केलेल्या दुचाकीला धडकून वॉचमन केबीनला धडकली. यामध्ये केबीनचे तसेच सुरक्षा कठड्याचे नुकसान झाले. सुदैवाने व्हॅनच्या पाठीमागील नागरिक वेळीच बाजूला झाले म्हणून पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर दुसरी व्हॅन मागवून त्यातून कैदी कारागृहाकडे नेण्यात आले.
कैद्यांच्या व्हॅनचा ब्रेक झाला निकामा अन् उडाला गोंधळ, सीपीआर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 4:04 PM