कोल्हापूर : खासगी सेन्सॉर बोर्ड हे प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्याची डोकेदुखी आहे; पण त्याला घाबरून आपणाला जे मांडायचे आहे, ते ठामपणे समजावून सांगण्याची तयारी या क्षेत्रातील सर्वांनी ठेवली पाहिजे, असे मत ‘पानिपत’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कोल्हापूरचे सुपुत्र आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्याची इच्छा आहे, असेही गोवारीकर म्हणाले.पानिपत चित्रपटानंतर गोवारीकर आपले वडील अशोक आणि आई किशोरी यांच्यासह कोल्हापुरात आले आहेत. यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या प्रत्येक चित्रपटाची पहिली प्रत कुलस्वामिनी अंबाबाईला आणि जोतिबाच्या पायाशी ठेवण्याची आपली प्रथा आहे. यावेळीही माझ्या बहिणीने अंबाबाई आणि जोतिबाच्या पायाशी ‘पानिपत’ चित्रपटाची पहिली प्रत ठेवली होती,असे आशुतोष म्हणाले. कोल्हापूर हे माझे आवडते ठिकाण आहे, त्यामुळे कुटुंबियांसह येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनविण्यासाठी इतिहासातील दाखले तपासले पाहिजेत आणि योग्य त्या तज्ज्ञांचा सल्लाही घेतला पाहिजे. वास्तव आणि मनोरंजनाचा समतोल साधला पाहिजे, असे गोवारीकर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. पानिपत बनविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
ऐतिहासिक चित्रपट बनविणारा आणि प्रदीर्घ लांबीचे चित्रपट बनविणारा दिग्दर्शक म्हणून माझ्यावर ठपका बसला आहे; परंतु सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांना इतका वेळ रोखून ठेवण्याची क्षमता त्यातील कथानकालाच आहे, असेही ते म्हणाले.चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे, हे लक्षात ठेवून इतिहासाशी सांगड घातली गेली पाहिजे.
चित्रपटासाठी स्वातंत्र्य घेण्याचा दिग्दर्शकाला अधिकार आहे, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये, हे पाहिले पाहिजे. कथावस्तू प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. गांधी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे महात्माजींसारखे दिसत नाहीत, परंतु त्यांनी विषय जगभर पोहोचविला. चित्रपट बनविताना मी प्रथम कथेचा विचार करतो, नंतर अभिनेत्याचा. त्यामुळे माझ्या चित्रपटाला येणारा त्यातील विषयासाठी येतो, असे गोवारीकर म्हणाले.मराठीत चित्रपट बनविण्याची इच्छामराठीत चित्रपट बनविण्याची इच्छा आहे. पण तितक्या ताकदीची कथा माझ्याकडे नाही. ती मिळताच मी मराठी चित्रपट करेन, असेही गोवारीकर म्हणाले. तीन वर्षांनी एक चित्रपट करत असल्यामुळे मी सध्या अभिनयासाठी उपलब्ध आहे, असेही गंमतीने ते म्हणाले. माझा चित्रपट हिंदी असला तरी माझे बहुतेक तंत्रज्ञ, काही कलाकार हे मराठीच आहेत.