कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे खासगी शिकवणी वर्ग अथवा कोचिंग क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने सोमवारी परवानगी दिली. त्यानुसार आज, मंगळवारपासून हे क्लासेस सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे मार्चपासून खासगी क्लासेस बंद होते. मे पासून विविध उद्योग, व्यवसाय टप्प्याटप्याने सुरू झाले. मात्र, कोचिंग क्लासेसला परवानगी मिळाली नव्हती. त्यावर कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनने (केप्टा) क्लासेस सुरू करण्याची निवेदनाद्वारे वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. त्यावर अटी, शर्तीस अधीन राहून हे क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. प्रशासनाची परवानगी मिळाल्याने शहरातील ५००, तर जिल्ह्यातील २००० खासगी क्लासेसमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.
प्रतिक्रिया
खासगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आम्ही आज, मंगळवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे क्लासेस सुरू करणार आहोत.
-प्रा. अतुल निंगुरे, उपाध्यक्ष, केप्टा.
क्लासेससाठी अटी
एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा.
क्लासेसच्या प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करावे.
प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
विद्यार्थ्यांनी एकमेकांचे पेन, मोबाईल, इतर शैक्षणिक साहित्य हाताळू नये.
क्लासेसमधील वर्गांचे रोज निर्जंतुकीकरण करणे.