राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणारे ‘पीपीई’ किट उपलब्ध नसल्यानेच खासगी डॉक्टरांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तरीही कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांशी हॉस्पिटल ठरावीक कालावधीसाठी सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वयोवृद्ध डॉक्टर, लहान मुले असलेल्या महिला डॉक्टरांची मात्र पूर्ण ओपीडी बंद दिसत आहे.
‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, म्हणून राज्य व केंद्र सरकारने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोणीही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करीत असतानाच अत्यावश्यक सेवा चालू ठेवली आहे. आरोग्य यंत्रणा अत्यावश्यक सेवेत असले तरी ‘कोरोना’च्या भीतीने खासगी हॉस्पिटल सुरुवातीच्या टप्प्यात बंद राहिले. ‘सर्दी, खोकला, ताप’ ही ‘कोरोना’च्या लक्षणात येत असल्याने अशा रुग्णांना हात लावायलाच नको, म्हणून डॉक्टरांनी प्रॅक्टीसच बंद ठेवली होती. त्याचा परिणाम रुग्णांवर झाला असून, तशा तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हात जोडून खासगी डॉक्टरांना ओपीडी सुरू करण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सुमारे ५ हजार खासगी प्रॅक्टीशनर्स आहेत. यामध्ये शहरात ३ हजार आहेत. ग्रामीण भागात गावागावांत ओपीडी सुरू दिसतात. मात्र, शहरातील ओपीडी काही ठिकाणी उघडण्याचे धाडस करीत नसल्याचे चित्र आहे. काही डॉक्टर आपली ओपीडी सांभाळून सरकारी यंत्रणेलाही मदतही करीत आहेत.
- ‘पॅथॉलॉजी लॅब’मध्ये कर्मचारीच येईनात
साधारणत: कोल्हापूर शहरातील पॅथॉलॉजी, रेडॉलॉजी लॅबमध्ये शेजारील गावांतील कर्मचारी आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना गावातून बाहेर सोडत नाहीत. त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांवर दोन-अडीच तासच येथे कामकाज सुरू आहे.
- फोनवरून रुग्णांना सल्ला
फॅमिली डॉक्टरांनी ओपीडी बंद केली असली तरी रुग्णाने आजाराबाबत फोनवरून माहिती दिली तर त्यांना औषधाचा सल्ला दिला जातो.
जिल्ह्यात बहुतांशी हॉस्पिटल्स सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी ‘कोरोना’च्या भीतीपोटी बंद असतील तर त्यांनाही सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. आशा जाधव (सचिव, कोल्हापूर मेडीकल असोसिएशन)