कोल्हापूर : कोरोनासदृश लक्षण असलेल्या रुग्णांना खासगी डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी बंधनकारक करावी. सर्दी, ताप, घसादुखी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास असलेले औषधे नेण्यासाठी आल्यास त्यांची नावे, पत्ता, संपर्क नंबर नोंदवून घ्यावे, तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडे नोंदवहीतील नावे द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी सायंकाळी उशिरा काढले.
जिल्हाधिकारी रेखावार यांच्या आदेशात म्हटले आहे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खासगी डॉक्टरांकडे जाणाऱ्या कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करून त्यांना अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी सक्तीनी करावी, औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनाचा त्रास असलेल्यांना औषधे द्यावीत, कोरोनासदृश लक्षणावर औषधे मागायला आल्यानंतर अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला औषध दुकानदारांनी द्यावा व त्यांचे नाव नोंदवहीत घ्यावे.