कोल्हापूर : निदान झालेला प्रत्येक क्षयरुग्णाची माहिती क्षयरोग विभागाकडे कळविणे खासगी वैद्यकीय व्यावसायिक, खासगी प्रयोगशाळा, औषध विक्रेते यांना बंधनकारक आहे. त्यानुसार वेळेवर आणि अचूक अशी माहिती क्षयरोग विभागास नियमित कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी गुरुवारी केले.
भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ‘क्षयरोगमुक्त भारत-२०२५’ या उद्दिष्टास अनुसरून कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग विभाग यांच्या वतीने संशयित क्षयरुग्ण निदान आणि उपचारापासून वंचित राहू नयेत यासाठी खासगी औषध विक्रेते यांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पोळ यांनी आवाहन केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी सपना घुणकीकर यांनी शासन परिपत्रकाचे वाचन करून शासन मार्गदर्शक सूचनेनुसार क्षयरोग विभागास क्षयरुग्णांची माहिती देऊन कारवाईचे प्रसंग टाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी केमिस्टस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मदन पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी क्षयरोग विभागास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार योजना आणि इतर सुविधांचा लाभ देता यावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. घरोघरी सर्वेक्षण करून आढळून येणाऱ्या संशयित क्षयरुग्णांना सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि त्यांचे नजीकचे खासगी एक्स-रे सेंटर येथे एक्स-रेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मोफत एक्स-रेचा संशयित क्षयरुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अशासकीय संस्थेचे अधिकारी घनश्याम वर्मा, गणेश पाटील, सूर्यकांत पोटे आणि क्षयरोग विभागाकडील सुशांत कांबळे, अभिनय पोळ, प्रवीण क्रुझ उपस्थित होते.