कोल्हापूर : खाजगी रुग्णालयांनी वॉर रुमला उपलब्ध बेडची माहिती तात्काळ द्यावी. हॉस्पिटलना काही अडचणी असतील, तर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सांगा. पण, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना परत पाठवू नका, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी केल्या.कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि प्रशासनानाने नियुक्त केलेले समन्वयक यांची बैठक झाली. त्यामध्ये आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी झाले.
कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टर आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. पण दुसरीकडे अडचणीत आलेल्या रुग्णाला बेड मिळविण्यासाठी अनेक हॉस्पिटल फिरावी लागतात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत.
रुग्ण अस्वस्थ असताना त्याला नेमके कोठे न्यावे, हे नातेवाईकांना सुद्धा समजत नाही. अशा वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम नागरिकांना आधार ठरेल.पण त्यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटलच्या प्रशासनाने आपल्याकडे उपलबद्ध बेडची माहिती तात्काळ अपडेट करणे आवश्यक आहे.
यामुळे वॉर रुम मधील लोकांना येणाऱ्या दूरध्वनीवरून अचूक माहिती देता येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार जाधव, जिल्हाधिकारी देसाई , आयुक्त कलशेट्टी यांनीही हॉस्पिटलना काही सूचना केल्या.