कोल्हापूर : मायनिंग व्यवसायासाठी १० टक्के व्याजाने घेतलेल्या १० लाख रुपयांच्या बदल्यात सुमारे २७ लाख ५० हजार रुपये परतफेड करूनही पुन्हा वारंवार धमकी देऊन ६० लाखांच्या कर्जवसुलीचा तगादा लावणाºया दुर्गे पितापुत्रावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुभाष रामचंद्र दुर्गे आणि त्याचा मुलगा संकेत दुर्गे (दोघे रा. संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी) अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती, सुधीर आप्पासाहेब पाटील (वय ६०, रा. सुर्वे कॉलनी, ताराबाई पार्क) यांचा मायनिंग मशीन भाडेतत्त्वावर देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यांनी राजारामपुरीतील शिवाजी हौसिंग सोसायटीतील गाळा क्रमांक १ मधील संकेत डेव्हलर्पसचे मालक संशयित सुभाष रामचंद्र दुर्गे यांची भेट घेऊन कर्जरूपाने १८ फेब्रुवारी २०११ ते आॅगस्ट २०१६ पर्यंत टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले.
दुर्गे यांनी आपली पत्नी, मुलगा संकेत, फर्म आणि स्वत:च्या बॅँक खात्यावरून ही रक्कम धनादेशाद्वारे दिली. त्यासाठी त्यांनी दरमहा १० टक्के व्याज लावले. पैशाच्या संरक्षणापोटी पाटील यांच्याकडून त्याने बॅँकेचे कोरे धनादेश व कोरे स्टँम्प स्वाक्षरी करून घेतल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. यानंतर दुर्गे याने पाटील यांच्या ३५ लाख रुपये किमतीच्या राहत्या फ्लॅटची किंमत परस्पर फक्त तीन लाख रुपये केली. दिलेले कोरे धनादेश व स्टँम्पचा दुरुपयोग करून फ्लॅटचे संचकारपत्र नोटरी केले. पाटील यांनी घेतलेल्या कर्जापोटी दुर्गेच्या बॅँक खात्यावर साडेसात लाख रुपये जमा केले. तसेच कार्यालयात जाऊन त्याला वेळोवेळी २० लाख रुपये रोख दिले. दिलेल्या पैशाबाबतचे स्टेटमेंट दुर्गेच्या कार्यालयातील लिपिकांनी त्यांना दिले असल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले.
कर्जरूपाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात २७ लाख ५० हजार रुपये देऊनही पुन्हा ६० लाख रुपये द्यावेत, असा दुर्गे याने आग्रह धरला. त्याने या ६० लाखांच्या पैशाच्या वसुलीसाठी पाटील यांच्याकडे पैशाची तगादा लावला. मुलगा संशयित संकेत दुर्गे यानेही वारंवार त्यांच्या घरी जाऊन धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुभाष दुर्गे व त्याचा मुलगा संकेत दुर्गे या दोघांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.१० लाखांच्या बदल्यात २७ लाख ५० हजारांची परतफेडसंशयित सुभाष दुर्गेने पाटील यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये राजारामपुरीतील फर्मच्या कार्यालयात बोलावून घेतले. पाटील यांनी त्यांना घेतलेल्या १० लाखांच्या कर्जापोटी व्याजासह २७ लाख ५० हजार रुपयांची परतफेड केली. हा व्यवहार पूर्ण झाला असल्याने तारण कोरे धनादेश व स्टँम्प परत देण्याची मागणी पाटील यांनी केली. त्यावेळी दुर्गे याने त्यांना अद्याप ६० लाख रुपये कर्जबाकी असल्याचे सांगून त्याची परतफेड करण्याचा तगादा लावला.