कोल्हापूर : खासगी सावकारीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेला महापालिकेचा कर्मचारी राजेंद्र ज्ञानदेव वरपे (वय ५१, रा. शिवगंगा अपार्टमेंट, सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ) याला न्यायालयाने उद्या, मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हा दाखल झालेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायासाठी घेतलेले १८ लाख ५७ हजार रुपये व्याजासह ५३ लाख २६ हजार रुपये परत देऊनही पुन्हा मुद्दल व व्याजाच्या वसुलीसाठी तगादा लावल्याची तक्रार दीपक चंद्रकांत पिराळे (वय ५०, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिसात केली होती.
फिर्यादी पिराळे यांनी व्यवसायासाठी खासगी सावकार राजेंद्र वरपे याच्याकडून एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१८ पर्यंत वेळोवेळी एकूण १८ लाख ५७ हजार रुपये व्याजाने घेतले. फिर्यादी पिराळे याने वेळोवेळी मुद्दलसह एकूण ५३ लाख २६ हजार रुपये त्याला परत दिले. तरीही वरपे याने पिराळे यांच्या पत्नी व भावाच्या नावावरील वडणगे (ता. करवीर) येथील घर जबरदस्तीने मेहुणी व साडू यांच्या नावे नोटरी करार करून घेतले. त्यानुसार वरपे यांच्यासह सुहास उर्फ पिंट्या जयसिंगराव घाटगे (रा. शिवगंगा अपार्टमेंट, शनिवार पेठ), साडू रामचंद्र बापू पाटील, मेहुणी वैशाली रामचंद्र पाटील (दोघे रा. खाटांगळे, ता. करवीर) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हे दाखल झाले.
दरम्यान, संशयित राजेंद्र वरपे याच्याकडून खासगी सावकारीतून फसवणूक झाल्याची कोणाची तक्रार असेल तर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.