इचलकरंजी : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्या बाजूने देतो, असे सांगून तीन लाख रुपयांची लाच घेताना एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. भिकाजी नामदेव कुऱ्हाडे (वय ५५, मूळ गाव नागराळ-कर्नाटक, सध्या रा. साईनगर, चंदूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी दोन साथीदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. सारंग भिकाजी कुऱ्हाडे (२६, रा. साईनगर, चंदूर) व इम्रान मुसा शेख (४१, रा. शंभर फुटी रोड, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कवठेगुलंद (ता.शिरोळ) येथील एका व्यक्तीची जमिनीच्या दाव्याची अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या दाव्याचा निकाल अप्पर जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्या बाजूने लावून घेतो, असे म्हणून कुऱ्हाडे याने संबंधित व्यक्तीकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील दोन लाख रुपये मार्च २०२१ पूर्वीच घेतले होते. त्यानंतर आणखीन तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी भिकाजीचा मुलगा सारंग व इम्रान यांनी भिकाजीला सहकार्य केले.
याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने १७ मार्च २०२१ ला याबाबतची पडताळणी केली. त्यावेळेपासून पथकामार्फत कुऱ्हाडे याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. पडताळणीमध्ये भिकाजी याने लाचेची मागणी केल्याचे आणि त्यासाठी त्याला मुलगा सारंग व इम्रान यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मंगळवारी तीन लाख रुपये घेऊन भिकाजी याने संबंधित तक्रारदाराला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका दुकानासमोर बोलावले होते. तेथे रक्कम स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकामध्ये पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद कोरे, विकास माने, नवनाथ कदम, मयूर देसाई, संदीप पडवळ, सुरज अपराध, आदींचा समावेश आहे.
चौकट
रुबाब मोठा
भिकाजी कुऱ्हाडे हा मूळ गावाकडून चंदूर येथे राहण्यास आल्यानंतर एका पतसंस्थेत काम करीत होता. त्यानंतर त्याची आर्थिक उलाढाल वाढली होती, तसेच त्याचा रुबाब मोठा होता. त्याच्यावर कारवाई झाल्याचे समजताच तो राहत असलेल्या परिसरात चर्चेला ऊत आला होता.
फोटो ओळी
२४०८२०२१-आयसीएच-०१-भिकाजी कुऱ्हाडे २४०८२०२१-आयसीएच-०२- सारंग कुऱ्हाडे २४०८२०२१-आयसीएच-०३-इम्रान शेख