कोल्हापूर : स्वयंअर्थसाहाय्य शाळा धोरण रद्द व्हावे, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी वेतन आदेश व्हावेत, प्राथमिक शाळांना त्वरित संचमान्यता मिळावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघातर्फे निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन निरीक्षक ए. आर. पोतदार यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी बोलताना संघटनेचे राज्य सदस्य संतोष आयरे म्हणाले, अनेक वेळा निवेदने देऊनसुद्धा शासनाच्या वतीने कोणतीही दखल घेतली जात नाही. संघटनेच्या वतीने सर्वच अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान मिळावे, अनुदानास पात्र घोषित शाळांना वेतन अनुदानाची तरतूद करून वेतन अदा करण्याचे आदेश व्हावेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड वेतनश्रेणी लागू करावी, शाळा तिथे मुख्याध्यापक, लिपिक, सेवक असावा, तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनसुद्धा अद्याप कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्यामुळे शासनाचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. जर आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन तीव्र पद्धतीने करण्यात येईल. आंदोलनात विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष अशोक आरंडे, शहराध्यक्ष दस्तगीर मुजावर, एम. डी. पाटील, रंगराव कुसाळे, सुदर्शन मगदूम, टी. आर. पाटील, मोहन आवळे, नितीन पानारी, अभिजित साळोखे, मुकुंद चव्हाण, नरसिंग महाजन, फारूक सय्यद, गणेश बांगर, संदीप डवंग, रवी नाईक, राजाराम संकपाळ, संतोष पाटील, विलास बोरचाटे, गिरीजा जोशी, शरिफा पेंढारी, अरुणा हुल्ले, अशोक कांबळे, अर्जुन कांबळे, यशवंत हेगडे, सागर जाधव, पंडित मस्कर, दशरथ कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खासगी शिक्षक महासंघाची निदर्शने
By admin | Published: January 17, 2016 12:27 AM