भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे म्हणून आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा फतवा काढला आहे. स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपासाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासन व संबंधित शेतकऱ्यांत आगामी काळात संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाने पिण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित केले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुबा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी करून पाणी वापरावर निर्बंध आणले जात आहे. उपसाबंदी पाटबंधारे विभागातर्फे जाहीर केली जाते. अंमलबजावणी वीज वितरण कंपनी करते. उपसाबंदीच्या कालावधीत थ्रीफेज वीज कनेक्शन पूर्णपणे बंद ठेवणे आणि आकडे टाकून चोरून वीज घेऊन पाणी उपसा करू नये यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वीज प्रशासनाची आहे. परंतु, प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी वीज प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही. सर्वच ठिकाणी थ्रीफेज व सिंगल फेज अशी वीज वितरणाची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे उपसाबंदी करणे अडचणीचे होत आहे. अनेक ठिकाणी उपसाबंदी नसतानाच्या कालावधीत नियमित वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे उपसा बंदी करा, असे सांगण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास पहिल्यांदा वीज सुरळीत द्या, असे शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागत आहे, असे एका बाजूला चित्र आहे. दुसऱ्या बाजूला उपसा बंदीची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास पिण्यासाठी आरक्षित पाण्यावर घाला येणार आहे. पाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. यामुळेच उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी टंचाई निवारण बैठकीत दिली. बैठकीतील सूचनेचा आधार घेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपासाबंदी केली आहे. काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. या कालावधीत विहिरीतील ते पाणी उपसतात, अशा तक्रारी आहेत. उपसाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारेफायद्यापेक्षा नुकसानच..शेतकऱ्यांच्या खासगी कूपनलिका व विहिरींतील पाणी उपसाबंदीच्या वेळचे शिल्लक राहिलेले पाणी काय करणार, हे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. नदी, तलाव यावरील लागू करण्यात आलेल्या उपासाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा सरसकट निर्णय घेतल्याचे ‘पाटबंधारे, वीज वितरण’च्या प्रशासनाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे फायदा तर कोणाचा नाहीच, उलट विहीर, कूपनलिकेवर अवलंबून असलेली पिके वाळल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.कोठे आहे उपसाबंदी?चिकोत्रा, चित्री, भोगावती, पंचगंगा, कासारी या खोऱ्यांसह २१ लघु पाटबंधारे प्रकल्पांवर उपसाबंदी सुरू आहे. ज्या तलावावर उन्हाळी पिके आहेत, त्या उर्वरित १४ लघु पाटबंधारे तलावावरही उपसाबंदी करण्यात येणार आहे.
खासगी विहिरी, कूपनलिकांवरही आता उपसाबंदी
By admin | Published: April 18, 2016 12:43 AM