यवलूज : पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावातील सार्वजनिक रस्त्यांच्या साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात चर खुदाई करून एका खासगी दूरध्वनी कंपनीने केबल पुरून नेण्याचे कामाचा सपाटा लावल्याने काम सुरू असलेल्या भागातील रस्ता व संपूर्ण साईडपट्ट्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
गेली काही दिवस या खासगी दूरध्वनी कंपनीने अनेक ठिकाणी जेसीबी मशीनद्वारे प्रमुख रस्त्यांला लागून केबल टाकण्याकामी लांब व खोल अशी जागोजागी चरखुदाई केली आहे. यामध्ये यवलूज, पडळ, माजगांव, म्हाळुंगे, पुशिरे आदी गावांतील मुख्य रस्त्यांच्या चांगल्या बनविलेल्या साईडपट्टीवरून चर खोदून केबल पुरून नेण्याचे काम सुरू असल्याने साईडपट्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुळातच कमी रूंदी असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना या भागातील वाहनधारकांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित काम घेतलेल्या ठेकेदारांकडून काही ठिकाणी खोदून ठेवलेले चर आजही ‘जैसे थे’ अवस्थेतच आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील काम सुरू असलेल्या भागातील रस्त्यांच्या उरल्या-सुरल्या साईडपट्ट्याही केबल खुदाई कामासाठी खासगी दूरध्वनी कंपनीने बिनबोबाटपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाक कारभारावर नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असून या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही, अशीही विचारणा होऊ लागली आहे.
कोट....
- गेले काही दिवस तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावाच्या प्रमुख रस्त्यांच्या साईडपट्टीवर खासगी दूरध्वनी कंपनीचे चरखुदाईचे काम सुरू असुन अनेक ठिकाणी ते रखडले आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांबरोबर साईडपट्ट्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने येथील नागरिकांना खासगी कामाचा सार्वजनिक ताप झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
पांडुरंग काशीद सरपंच, यवलूज.
फोटो ओळ - पडळ (ता. पन्हाळा) येथील अनेक दिवस केबल खुदाईचे रखडलेले काम.