कोल्हापूर : शहरातील मध्यवस्तीत गजबजलेला व दाटीवाटीचा प्रभाग म्हणून बिंदू चौकाकडे पाहिले जाते. अंबाबाई मंदिरानजीक असलेल्या या प्रभागाची मुख्य समस्या म्हणजे पार्किंगचा उडालेला बोजवारा. पर्यटन व देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची वाहने रस्त्यावरच उभी असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते त्याचा त्रास रहिवाशांना होत असल्याची तक्रार आहे. नगरसेवकांचा आपल्या भागापुरताच संपर्क, तर काही भागांनी मतदान केले नसल्याने त्यांनी अजिबात संपर्क ठेवला नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होतात. रविवार पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ व गुरुवार पेठ यांच्या वेशी लागून असलेल्या या दाट वस्तीच्या प्रभागात मध्यमवर्गीय, कष्टकरी, व्यापारी, विक्रेते, आदी वर्गांतील लोकांचा अधिवास आहे. राजाराम रोड, आझाद गल्ली, हुजूर गल्ली, शिवाजी रोड, रिकिबदार गल्ली, गंजी गल्ली, हत्तीमहाल रोड, मटण मार्केट, बिंदू चौक असा परिसर या प्रभागात येतो. परिसराची विभागणी गोलाकार स्वरुपात झाली आहे. खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, ओसंडून वाहणारे कोंडाळे, दुर्गंधी व डासांचे साम्राज्य या ठिकाणीदेखील आहेत; पण प्रभागाची प्रमुख समस्या म्हणजे अस्ताव्यस्त पार्किंग. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे पार्किंगचा उडालेला बोजवारा ही नित्याचीच बाब झाली आहे. त्याशिवाय रस्त्यावरील कोंडीमुळे दुचाकी वाहनांचे पार्किंग दिसेल त्या गल्लीत होत असल्याने नागरिकदेखील वैतागले आहेत. यामुळे अनेकवेळा वाद झाले असून, प्रसंगी हातघाईचे प्रकारही घडतात. आझाद गल्ली या ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने ही समस्या प्रकर्षाने जाणवते. हा रस्ता मास्टर प्लॅननुसार रुंद करावा, अशी १५ वर्षांपासून मागणी आहे; परंतु विद्यमान नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले. हा रस्ता पेव्हिंग ब्लॉकचा असून, या ठिकाणी नेहमी अपघात होतात. त्यामुळे येथे डांबरी रस्ता करावा, अशी मागणी आहे, पण ती ही पूर्ण झालेली नाही. त्याचबरोबर राजाराम रोडवरील करवीर नगर वाचन मंदिराशेजारील जवळपास सात ते आठ फूट रुंदीचा रस्ता गेली दहा वर्षे रखडलेला असून, खराब रस्त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात. समस्या मांडल्यावर ‘तुम्ही आम्हाला मतदान केलेले नाही; त्यामुळे तुमचे काम होणार नाही...’ असे उत्तर मिळते, असे नागरिकांतून सांगण्यात आले. राजाराम रोडवरील कोंडाळा तर नेहमीच ओसंडून वाहत असतो. या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनांचे पार्किंग आहे. तेथून पर्यटक चालत मंदिराकडे येत असताना कोंडाळा व गटारीतील अस्वच्छता व दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. लुगडी ओळ रस्त्यावरील माळकर तिकटी येथे तर वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे. अस्ताव्यस्त लावलेल्या रिक्षांमुळे नागरिकांना चालत जाणेही मुश्कीलीचे होते. मटण मार्केट रस्त्यावर कामानिमित्त खोदकाम झाल्याने हा रस्ता अनेक दिवसांपासून बंद आहे. मटण मार्केटसह कोंबडी बाजार, लोखंड बाजार या परिसरातही स्वच्छता व औषध फवारणीच्या अभावामुळे डासांचे साम्राज्य आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. प्रभागातील मुख्य रस्त्यांची स्थिती थोडी चांगली असली तरी अंतर्गत रस्त्यांची मात्र दुर्दशा आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यांवर डांबरच पडले नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही या ठिकाणी आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत आहे; तर काही ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना ठणठणाट करावा लागत आहे. लुगडी ओळ, सोमवार पेठ परिसर, रविवार पेठ परिसरातील काही गल्लीतील ठिकाणी नगरसेविका व त्यांच्या पतींचा संपर्क चांगला आहे. प्रभागात आपला नेहमी संपर्क असून, गेल्या चार वर्षांत दीड कोटी रुपयांची कामे केली आहेत. येत्या काळात ५० लाखांची कामे केली जाणार आहेत. त्यांपैकी बहुतांश कामे मंजूर झाली आहेत. शाहू टॉकीज ते कच्छी वस्तीपर्यंतचा रस्ता, जैन मंदिराच्या पिछाडीचा रस्ता यांचे डांबरीकरण केले आहे. घुडणपीर, परीट गल्ली परिसरातील आतील बाजूच्या ड्रेनेज लाईनचे २० लाखांचे काम केले आहे. मटण मार्केटमध्ये मासे विक्रेत्यांसाठी सहा दुकानगाळे बांधून दिले आहेत. लोकवर्गणीतून खाटीक मशीद परिसरातील रस्ता केला आहे.- ज्योत्स्ना पवार-मेढे, विद्यमान नगरसेविका
पार्किंगचा बोजवारा हीच समस्या
By admin | Published: February 11, 2015 11:48 PM