कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात रुग्णालयांची संख्या वाढली आहे. परिसरातील अनेक इमारतींमधील पार्किंगच्या जागेचा गैरवापर केला जात आहे. यामुळे राजारामपुरीत वाहनांच्या पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सोडवावी, अशी मागणी ई-वाॅर्ड लोककल्याण व संघर्ष समितीतर्फे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजारामपुरीत रुग्णालये सुरू करताना पार्किंगच्या जागेचाही गैरवापर केला गेला आहे. यामुळे रुग्णांची वाहने वाहतुकीस अडथळा होईल, अशी लावण्यात येतात. यातून रहिवासी आणि रुग्णांच्या नातेवाइकांत वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. यामुळे राजारामपुरी पहिली ते १५ व्या गल्लीतील दवाखाने आणि त्यांच्या बांधकामाच्या नकाशांचा सर्व्हे करावा. पार्किंग स्पेस खुले करावे. यासंंबंधीची कार्यवाही करून २० दिवसांनी स्वतंत्र बैठक आयोजित करावी.
निवेदन देताना अनिल घाटगे, अनिल कदम, महादेव पाटील, बाबा इंदूलकर, दुर्गेश लिंग्रस, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.