नागरिकांचा सवाल
जयसिंगपूर : शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे शंभर ते दीडशे भटकी कुत्री याठिकाणी वावरत आहेत. सायंकाळच्या वेळेस तर या मार्गावरून ये-जा करणे मुश्किलीचे बनले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिकांतून विचारला जात आहे.
अकराव्या गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. ड्रेनेजमध्ये टाकलेले टाकाऊ मांस खाण्यासाठी कुत्र्यांची झुंबड उडालेली असते. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करीत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मध्यंतरी पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव ती मोहीम थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
---------------------------
कोट - अकराव्या गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी रुग्णालये असल्यामुळे दुचाकीवरून येणा-या रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांकडून एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर पालिकेने याचा बंदोबस्त करावा.
- अण्णासाहेब दानोळे, ज्येष्ठ नागरिक